अष्टांग योग
नमस्कार,
योग हा शब्द 'युज' या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो.
गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.”
हिंदू दर्शनातील प्राचीन मुलभूत सूत्रांच्या रुपामध्ये योगाची चर्चा आहे, ज्यांचा उल्लेख पतंजली योग सूत्रमध्ये आहे. महर्षी पतंजली आपल्या दुसऱ्याच योग सूत्र मध्ये योगाची व्याख्या
“योगः चित्त-वृत्ती निरोधः “ – योग सूत्र १.२
योगाचे एक वैशिष्ट्य हे आहे कि तुम्ही युवक असा कि वयोवृध्द, निरोगी असा कि आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदाई आहे आणि तो सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो. वयपरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते. मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सुक्ष्मतेवर अधिक कार्य करू लागतो.
महर्षी पतंजली योगाची आठ अंगे आहेत किंवा अष्टांग योग होय.
ही आठ अंगे मुख्यत्वे दोन विभागांत आहेत.
बहिरंग योग - यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार
आणि
अंतरंग योग - ज्यात धारणा, ध्यान, समाधी येतात.
पाचवे अंग म्हणजे प्रत्याहार जे बहिरंग योगाला अंतरंग योगाला जोडणारा सेतू आहे. माणसाचे स्थूल शरीर व सूक्ष्म मन यांचा अत्यंत घनिष्ट संबंध आहे. म्हणूनच त्यांचा एकत्रितपणे विचार करून शरीरसंवर्धनासाठी आणि मनशुद्धीसाठी, मनोकायिक आरोग्य लाभावे म्हणून ही यम, नियम आदी साधने सांगितली आहेत. ही अंगे मानवी अस्तित्वाच्या बाह्यांगाचा प्रामुख्याने विचार करतात, म्हणून त्यांना बहिरंग योग म्हणतात.
यम - म्हणजे योगसाधकासाठी असलेली नैतिक आणि सामाजिक मार्गदर्शक तत्त्वे. यम पाच आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह.
अहिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे. सत्य म्हणजे खरेपणा. योगसाधकाने कायम स्वत:प्रती तसेच इतरांप्रती खरे राहिले पाहिजे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. याचा अर्थ आपल्या मालकीचे नाही ते आपण घेऊ नये. ब्रह्मचर्य म्हणजे आत्मसंयम. याची मदत होते ती आपली व्यसने व टोकाच्या सवयींचे बंध तोडण्यामध्ये यासाठी धैर्य आणि इच्छाशक्तीची गरज भासते. अपरिग्रह म्हणजे लोभ सोडणे. याचा अर्थ आपल्या मालकीच्या पण गरजेपेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही गोष्टीचा शारीरिकरीत्या, मानसिकरीत्या व भावनिकरीत्या त्याग करणे.
नियम : स्वत:चे निरीक्षण करून स्वत:बद्दल अधिकाधिक जागरूक होण्यासाठी आपल्यातच असलेला एक आरसा आहे. नियमाच्या पाच शाखा आहेत. सौच, संतोष, तापस, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान. सौच : हे वातावरणाचे अंतर्गत व बाह्य शुद्धीकरण आहे. आपल्यामध्ये व आपल्या आजूबाजूला कशामुळे अशुद्धी निर्माण होते ते शोधून त्याचा नाश करण्याचा हा मार्ग आहे. संतोष : समाधानी राहता आले तर आपली हाव कमी होते, आपल्या लालसा आणि गरजा कमी होतात. तापस : तापस हा स्वयंशिस्तीचा आणि हिमतीचा सराव आहे. स्वाध्याय : स्वाध्याय म्हणजे स्वत:चा अभ्यास करणे. ईश्वरप्रणिधान : याचा अर्थ आहे. एकनिष्ठता आणि दिव्यत्वाला शरण जाणे.
आसन : आसने म्हणजे आपले शरीर लवचिक, तंदुरस्त आणि कणखर राखण्यात मदत करणाऱ्या शारीरिक स्थिती. शरीर आणि मनातील समायोजन व समतोल समजून घेण्याच्या तसेच त्याचा सराव करण्याच्या या पद्धती आहेत.
प्राणायाम :-लयबद्ध श्वसनाला योगामध्ये अतिशय महत्त्व आहे. प्राणायाम हे योगोपचारातले एक प्रमुख साधन आहे. प्राणायामाच्या अचूक व नियमित सरावामुळे फुफ्फुसांची श्वसनक्षमता वाढते आणि म्हणूनच साधकाचे आयुष्य वाढते. साधकाला निरोगी शरीर, स्थिर व प्रसन्न चित्त, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अचूक निर्णयक्षमता प्राप्त होते. प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासोश्वासाचे नियंत्रण आणि विस्तारीकरण. श्वासोश्वसाच्या योग्य तंत्रांचा सराव केल्यास रक्तामधील आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे प्राणशक्ती आणि जीवन ऊर्जा यांच्या नियंत्रणास मदत होते. प्राणायाम आणि योगासने हे एकमेकास पूरक आहेत. या दोन योगतत्वांचा मिलाफ झाल्याने शरीर आणि मनाच्या उत्तम प्रतीचे शुद्धीकरण व आत्म नियमन प्राप्त होते. प्राणायाम ही ध्यानाच्या गहऱ्या अनुभवाची तयारी असते.
प्रत्याहार म्हणजे मन आणि इंद्रिये यांच्यावर ताबा मिळवण्याची शिस्त. प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे इंद्रियांना शांत ठेवणे शक्य होते.
तर एखाद्या बिंदूवर, विषयावर एकाग्रता साधण्याची कला म्हणजे धारणा. यामुळे आंतरिक जागरूकता निर्माण होते व मनात सतत उद्भवणाºया विचारांचे संकलन होऊन मानसिक ताणतणाव दूर होतात.
धारणा दीर्घकाळ टिकून राहिली की मगच ध्यान लागते. साधकाच्या संपूर्ण मनोकायिक रचनेमध्ये सुयोग्य बदल घडवून आणण्याची शक्ती असते म्हणूनच ध्यानाला अतिशय महत्त्व आहे.
कोणत्याही त-हेचा व्यत्यय न येता दीर्घकाळ ध्यान लागले की समाधी लागते. हे योगसाधनेतील शेवटचे अंग किंवा टप्पा आहे. समाधी अवस्था हीसुद्धा एक अनुभूती आहे आणि त्यामुळेच ती वर्णनातीत आहे.
प्रत्येक साधकाने जीवनाची योग्य दिशा दाखवणा-या सर्वांगाचा टप्प्याटप्प्याने अभ्यास केला तर योगाभ्यासातून अपेक्षित व्याधीरहित जीवन आपल्याला जगता येईल.
योगाच्या या आठ अंगांमध्ये प्रावीण मिळवणे कठीण आहे पण कोणत्याही व्यक्तीसाठी हे अशक्य नाही.
प्रत्याहार या विशाये थोडे आदिक जानुन घेऊ या.
पाचवे अंग आहे प्रत्याहार. योगाच्या बहिरंगाकडून अंतरंगाकडे जाण्याचा तो सुलभ मार्ग आहे. बहिरंग व अंतरंग यांना जोडणारा तो सेतू आहे. अष्टांगयोगाच्या या आठ अंगांची रचना पाहिली व क्रम पहिला तर तो सोप्याकडून कठीणाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे अशा शिक्षणशास्त्रातील तत्त्वानुसार केलेले दिसते.
प्रत्याहार याचा अर्थ ज्ञानेंद्रिये आवरून धरणे, त्यांच्यावर नियंत्रण आणणे. कासव संकटसमयी ज्याप्रमाणे इंद्रिये कवचाच्या आत ओढून घेते, त्याप्रमाणे आपली ज्ञानेंद्रिये तात्पुरती कृतिहीन करणे म्हणजे प्रत्याहार करणे. प्रति + आहार या दोन शब्दांतून प्रत्याहार शब्द तयार झाला आहे. बहिरंगातून अंतरंगात प्रवेश होण्याची ही संक्रमणावस्था म्हणजे प्रत्याहार. योगाभ्यासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात यमनियमाच्या आचरणाने सात्त्विकता दिसू लागते. आसन प्राणायामात येणाऱ्या सुखानुभवातून ती अधिक वृद्धिंगत होऊ लागते. सदैव बाह्याकडे धाव घेणारी ज्ञानेंद्रिये आत वळवणे सोपे होऊ लागते.
‘जन विषयाचे किडे त्यांची धाव बाह्याकडे।। आपण करू शुद्धरसपान रे’ या ‘चाफा बोलेना’ या काव्यातील ओळी हेच सुचवतात. बहिरंगाचे मुख्य उद्दिष्ट कोणते? अंतरंगयोग म्हणजेच राजयोगाची प्राप्ती करून घेणे. अंतरंगयोगसाधनेत प्रगती करण्यासाठी शरीर व मन दोन्ही निरोगी असावे लागते. बहिरंगयोगाच्या अभ्यासाने, सरावाने अंतरंगयोगाची पूर्वतयारी केली जाते. अर्थातच योगाभ्यासाचा लाभ साधकाला अष्टांगयोगातील आठही अंगांच्या अभ्यासानेच प्राप्त होत असतो, हे लक्षात ठेवले पाहिजे.
प्रत्याहारामुळे भौतिक व इहवादी व्यवहारात रमलेला साधक आध्यात्मिक मार्गाकडे वळण्याकडे प्रवृत्त होतो. धारणा, ध्यान व समाधी अशा अतरंगयोगसाधनेतून त्याची उन्नती होऊ लागते. योगशास्त्राचे मूळ ध्येय ‘कैवल्यप्राप्ती’ असल्यामुळे साधकाने अंतरंगयोगाचा सखोल, सूक्ष्म अभ्यास करणे अपेक्षित आहे.
मानवी शरीरातील डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये बाहेरील व आतील वस्तू, संवेदना, घटना यांचे ज्ञान मिळवत असतात. श्रवण, दर्शन, गंध, स्वाद व स्पर्श यांचे ज्ञान ग्रहण करून त्या संवेदना चित्तात व बुद्धीत पोहोचवल्या जातात. एखाद्या वस्तूतून किंवा घटनेतून मिळालेल्या संवेदना कधी सुखद तर कधी दुःखद असतात. प्रथमदर्शनी आवडणाऱ्या, सुखकारक भासणाऱ्या संवेदना म्हणजे ‘प्रेयस,’ तर हितकारी ठरतात त्या ‘श्रेयस.’ वारंवार सतत सुखद संवेदनाच मिळाव्या असे मनाला वाटत असते ती ‘आसक्ती.’
खरे तर सुखद काय किंवा दुःखद काय, या दोन्ही संवेदना आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर शेवटी दुःखप्रदच ठरतात. योगाभ्यासाला अडचण निर्माण करतात. म्हणून महर्षी पतंजलीनी प्रत्याहाराचा अभ्यास करण्यास सांगितले आहे.
प्रत्याहार म्हणजे आत घेणे किंवा आपल्याकडे वळवणे. यासाठी प्रयत्न काय करता येईल, तर इंद्रियांची सुखकारक विषयांशी गाठ घालू न देणे. कानात कापसाचे बोळे घालते तर सुमधुर संगीत ऐकूच येणार नाही व त्याच गोष्टीकडे मन आकृष्टच होणार नाही. म्हणून पाहायचे असेल तर बंद डोळ्यांनी पाहावे. बोलायचे असल्यास स्वतःच्या शरीराशी बोलावे. पूर्वी अनुभवलेल्या सुखद स्पर्शाची आठवण करावी. आपल्या आवडत्या सुगंधाचा आस्वाद कल्पनेने घ्यावा. प्रत्याहाराच्या साधनेने इंद्रिये पूर्ण स्वाधीन होऊ लागतात. ज्ञानेंद्रिये नेहमी विषयात गुंतून पडतात. त्यांचा तो स्वभावच असतो. त्यांचा स्वभाव बदलण्याचे काम सोपे नाही.
योगा करण्याचे फायदे –
ताणतणावपासून मुक्ती - आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच तणाव असतो. पण नियमित योगा केल्यास, या ताणतणावपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तुम्ही सकाळी उठून रोज प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला पूर्ण दिवस एनर्जी मिळते आणि तुमच्यामध्ये उत्साह कायम राहतो.
शरीरातील साखरेवर नियंत्रण - आजकाल लहान वयातदेखील लोकांना मधुमेह झालेला ऐकायला मिळतो. शरीरामधील इन्सुलीनचं प्रमाण घटलं की, साखरेचं प्रमाण वाढतं. मात्र रोज योगा केल्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी - आजकाल खाण्याच्या पद्धती इतक्या बदलल्या आहेत की, त्याचा परिणाम शरीर लठ्ठ होण्यावर होत असतो. बऱ्याच जणांना ही समस्या असते. पण योगा केल्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहातं. योगामध्ये अशी अनेक आसनं आहेत ज्यामुळे तुमची पचनक्रिया योग्य राहते आणि तुमच्या शरीरामध्ये चरबी साठू शकत नाही.
रक्ताभिसरण चांगलं होतं - योगामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाने होण्यास मदत होते. शिवाय सर्वच अवयवांना योग्य व्यायाम मिळतो. यामुळे श्वासोच्छवास योग्य तऱ्हेने घेतला जातो आणि रक्ताभिसरण प्रक्रिया अप्रतिम होते.
म्हातारपणात आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी - तरूणपणी शरीर आपल्याला योग्य साथ देत असतं. कारण त्यावेळी कितीही आजार आला तरीही प्रकृती साथ देते. पण जसं वय वाढतं तशा तक्रारीही वाढतात. शरीरावरही मर्यादा येतात. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच जर योगा करत असाल तर तुम्हाला म्हातारपणात आरोग्याच्या कमी समस्यांना सामोरं जावं लागतं.
राम कृष्ण हरि